आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये मागील काही वर्षांपासून बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. अशातच मागील पंधरा दिवसांपासून रात्री साडेदहा ते साडेबाराच्या दरम्यान डोंगराळ भागातील गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची भीती निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासानाने या घटनेकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे. काल रात्री (2 जूलै) साडेअकराच्या सुमारास धामणी परिसरात ड्रोनने फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण असून तरुणांनी घिरट्या घालत असलेल्या ड्रोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अवसरी बुद्रुक, निरगुडसर परिसरातील वळसे मळा, बेट वस्ती, भोकर शेत, चवरे एलभर मळा, हाडवळा, विजुरा, चव्हाण मळा, गुणगे, शेटे मळा, हिंगे मळा व गावठाण हद्दीत असणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळ आणि गावडेवाडी गावच्या काही परिसरात अज्ञात ड्रोन आकाशामध्ये फिरताना नागरिकांना दिसून आला होता. बहुतांश ड्रोन हे डोंगराळ भागाच्या कडेला असणाऱ्या गावांमध्ये घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या गावांमधील तरुणांनी ड्रोनचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली.
तालुक्यातील नागरिक या सर्व प्रकारामुळे भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातवरण आहे. प्रामुख्याने मंचर पोलीस ठाणे व पारगाव कारखाना पोलीस ठाणेच्या अंतर्गत ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ड्रोनद्वारे काही सर्वेक्षण चालू आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. तसेच हे ड्रोन उडविण्यास रात्रीच्या वेळी कोणाला परवानगी दिली आहे का? असे अनेक प्रश्न सध्या गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत खुलासा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.