छत्रपती कारखान्याचा कारभार अजित पवार विरोधकांना देणार, विद्यमान संचालकांना घरी बसवणार; पृथ्वीराज जाचक अध्यक्ष घोषित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती- इंदापूर तालुक्यात भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे. अजित पवार स्वतः सभासद असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या संचालकांनी कशा पद्धतीने गैरकारभार केला याची उदाहरणे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देत स्वतःच्याच नेतृत्वाखालील संचालकांचे वाभाडे सभासदांसमोर काढले. एवढेच नाही तर, आता सत्तेवर असलेल्या एकाही संचालकाला संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करत कारखान्याचे विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक हेच पुढील पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे जाहीर केले.

बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा हा निर्णय बारामती तालुक्यातील त्याचबरोबर इंदापूरमधील आमदार आणि क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासाठीदेखील धक्कादायक मानला जात आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 10 वर्षांनंतर सोमवारी 7 तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अचानक घडामोडी घडल्या आणि कारखान्यातील विरोधक असलेले शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. यामध्ये पृथ्वीराज जाचक यांच्याकडे पाच वर्षे कारखान्याची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऊस उत्पादकांच्या नाराजीनंतर अजित पवारांनी घेतला धाडसी निर्णय

पृथ्वीराज जाचक हे भवानीनगर कारखान्याच्या संस्थापकांच्या घराण्यातील आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात कारखान्याचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न लावून धरले. गेल्या काही वर्षांमध्ये कारखान्याच्या संचालकांबद्दल तक्रारी होत्या. त्याचबरोबर ऊस उत्पादक सभासदांची नाराजीदेखील होती. त्याचा फटका अजित पवार यांच्या समर्थकांच्या पॅनलला बसण्याची शक्यता लक्षात घेता अजित पवार यांनी हा धाडसी निर्णय घेऊन आपल्या विरोधकांच्या ताब्यात हा कारखाना देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.