
बारामतीत दोघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. तो माझ्या कितीही जवळचा कार्यकर्ता, कुणीही असला आणि त्याच्या मुलाने जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करायचा. मी असलं खपवून घेणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. पुढे असेच करत राहिले तर ‘मोक्का’ पण लावीन, असा सज्जड इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेल परिसरात ही मारहाणीची घटना घडली आहे. एका तरुणाला दोघांकडून लाथाबुक्क्या, पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
कारवाईचे आदेश
अजित पवारांनी सोशल मीडियातून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनेची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्याचं उल्लंघन कोणीही करू नये. ते कदापि सहन केले जाणार नाही.