Pune News – शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार, एक जखमी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चाराचकी व दुचाकी एकमेकांना धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

सदर घटना गुरुवारी (02 जानेवारी 2025) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. या घटनेबाबत टाकळी हाजी पोलीस खेडकर यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून तीन जण दुचाकीवरून कवठे येमाईच्या दिशेने जात होते. याच दरम्यान इचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच टाळकी हाजी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना उपचारांसाठी व ठार झालेल्या दोघांना पोस्टमार्टमसाठी साठी तत्काळ शिरुर येथे हलविण्यात आले आहे. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने टाकळी हाजी दूरक्षेत्र या ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती, खेडकर यांनी दिली.

दरम्यान, अष्टविनायनक महामार्ग वेगवान झाल्याने इचकेवाडी जवळील खार ओढ्या जवळच्या वळणावर येणारी-जाणारी वाहने अतिशय वेगात जातात. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूस तात्काळ गतिरोधक करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांनी व्यक्त केली आहे.