दीड कोटीचा निधी ‘गोखले’मधून वळवला, मिलिंद देशमुखांवर गुन्हा

नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधून (जीआयपीई) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांकडे काणाडोळा करीत सुमारे एक कोटी 42 लाखांचा निधी नियमबाह्यपणे वळविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. विशाल भीमराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. गायकवाड संस्थेचे ‘ऑफिशिएटिंग डेप्युटी रजिस्ट्रार’ आहेत. हा प्रकार डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत घडला. यूजीसीच्या 2023च्या ‘एमओए’नुसार संस्थेच्या खात्यातील निधी इतर खात्यात वळवणे किंवा प्रायोजक संस्थेला देणे नियमबाह्य आहे. मात्र देशमुख यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी गोखले इन्स्टिट्यूटला पत्र देत नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड कोटीची मागणी केली. त्यानंतर गोखले इन्स्टिटय़ूटच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने 14 डिसेंबर 2022मध्ये या मागणीला तत्त्वतः मान्यता दिली.

यापैकी एक कोटी दोन लाख रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर आणि 40 लाख रुपये चेकद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठविण्यात आले. या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, स्टॅम्प ड्युटी, प्रशासकीय खर्च इत्यादी कारणांनी दाखविण्यात आला. मात्र तपशील संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद आहे. देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची फसवणूक करत निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार डॉ. गायकवाड यांनी केला आहे.