पंधरा वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेली राज्यभरातील जवळपास 13 हजार वाहने ‘स्क्रॅप’ करण्यात येणार असून, यामध्ये पुणे शहरातील एक हजार 265 वाहनांचा समावेश आहे. ही वाहने येत्या डिसेंबरअखेरपर्यंत ‘स्क्रॅप’ केली जाणार आहेत. ज्या शासकीय वाहनांकडे अशा वाहनांची संख्या अत्यल्प आहे, त्यांची प्रक्रिया आरटीओकडून केली जाणार आहे.
व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी 2021 अंतर्गत जुन्या वाहनांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयांतील 15 वर्षे पूर्ण झालेली जुनी वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. त्यानुसार मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया राबविली जाते. सद्यःस्थितीतील राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांत 13 हजार वाहने 15 वर्षांपुढील आहेत. त्यांचे आयुर्मान संपले आहे. यामध्ये पुणे शहरातील एक हजार 265 वाहनांचा समावेश असून, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत ही वाहने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. संबंधित कार्यालयांना त्यांच्याकडील आयुर्मान संपलेल्या वाहनांची माहिती ‘एमएसटीसी’ या पोर्टलवर भरावी लागणार आहे. यामध्ये गाडीचा नंबर, फोटो आणि इतर संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करावी लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या वाहनांचा लिलाव होणार आहे. त्यानंतर एका कंपनीकडून ही वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. प्रत्येक कार्यालय आपल्याकडील वाहनांची माहिती अपलोड करून ही कार्यवाही करेल.
सरकारी कार्यालयांतील 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने दरवर्षी ‘स्क्रॅप’ केली जातात. यंदा शहरात अशी 1200 वाहने आहेत. ती स्क्रॅप करण्यात – येणार आहेत.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे