
पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या बैठकांचा जोर वाढला आहे. दरम्यान, माननीयांनी सुचविलेल्या कामांना निधी देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अभ्यास करून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी विधानभवनातील ‘व्हीआयपी’ कार्यालय गाठल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते, तर शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या मागणीनुसार विकासकामांसाठी निधी देण्यासाठी जोर लावला जात आहे. शहरातील आमदार व वजनदार माजी नगरसेवकांनी शेकडो कोटींच्या निधीची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख दहा-पंधरा नेत्यांसाठीच सुमारे दोन हजार कोटींची तरतूद केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर हा नवा पायंडा पाडला जाईल, अशी भीती आयुक्तांना आहे. तसेच आगामी काळात महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक येतील. पुढच्या वर्षी अंदाजपत्रकातील निधी देण्यावरून आमदार-नगरसेवक यांचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात 400 ते 500 कोटींची कामे सुचवल्याची चर्चा आहे. महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना झुकते माप दिले जात आहे.
शहरातील आमदार देताहेत पत्र…
■ शहरात महायुतीचे पाच तर विरोधी पक्षाचा एक आमदार आहे. गेल्या महिन्यात विद्यमान आमदारांनी महापालिकेत ठाण मांडले होते. त्यातून प्रशासनावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. आता याचाच आधार घेत शहरातील विविध विकास कामे करून घेण्यासाठी आमदार पत्र देत आहेत.
महापालिका आयुक्तांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. अंदाजपत्रकासाठी कोणत्या नेत्याने किती कोटी निधीची मागणी केली ते आयुक्तांनी जाहीर करावे. शहरातील 10 पुढाऱ्यांनी 2 हजार कोटींची मागणी केली आहे. – संजय बालगुडे, माजी नगरसेवक
अंदाजपत्रक तयार करताना अनेक राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे पत्र येत आहे. त्यांनी दिलेल्या पत्राचाही विचार केला जाईल.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका