महायुतीचा केवळ निधीवर डोळा; राज्य सरकारचेही दुर्लक्ष, अमृतमहोत्सवी वर्षाचा महापालिकेला विसर

पुणे महापालिकेला शनिवारी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमृतमहोत्सवी वर्षात विविध योजना राबवून मोठमोठे कार्यक्रम करून यानिमित्ताने महापालिकेला पुन्हा जगात वेगळे स्थान निर्माण करता आले असते. मात्र, सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांचा केवळ निधीवर डोळा आहे. तर, दरवर्षीप्रमाणे हिरवळीवर चहापानाचा कार्यक्रम घेतल्याने महापालिका आयुक्तांनाही अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज आहे. अमृत महोत्सवी वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिकेने गेली 3 वर्षे हा वर्धापन दिन साजराच केला गेला नाही. यंदा पुणे महापालिका स्थापनेस 15 फेब्रुवारी रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्षाची सर्व धुरा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर आहे. आयुक्त भोसलेदेखील येत्या दोन-तीन महिन्यांत निवृत्त होत आहेत. प्रशासकीय काळामध्ये महापालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून महापालिका आयुक्तांची होती. मात्र, आयुक्त, प्रशासनाला ते महत्त्वाचे वाटले नाही.

पालिकेत मागील तीन वर्षांपासून ‘प्रशासक राज’ असून, राज्यात आणि केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे केवळ महायुतीच्या ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात निधीचे सर्वाधिक वाटप करण्याचा धडाका लावला आहे. यंदा अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये विविध कार्यक्रम घेता येणे शक्य होते. अमृत महोत्सवी वर्ष संपण्याच्या तीन आठवडेआधी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, त्यांचे कामकाजहाँ कागदावर राहिले. आता या वर्षाची सांगता चहापानाच्या कार्यक्रमावर होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी महापालिकेच्या हिरवळीवर होणार आहे. यंदाच नाही; पण गेल्या तीन वर्षांत पालिकेच्या वर्धापन दिनाचा मोठा कार्यक्रम करता आला नाही, ही शोकांतिका आहे.

पालिकेने एखादा संकल्पदेखील केला नाही. प्रामाणिकपणे एक ते दीड लाख रुपये मिळकतकर भरणाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे होते. पण पालिकेत सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात निधीवाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

– प्रशांत बधे, माजी नगरसेवक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

प्रशासनाने त्यांची जबाबदारी पूर्ण केली नाही, याची खंत वाटते. किमान सर्व माजी नगरसेवकांसह माजी महापौर संघटनेला आमंत्रित | करून काही सूचना घेतल्या असत्या तर हा वर्धापन दिन उत्तमपणे साजरा करता आला असता.

  • अंकुश काकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर संघटना, पुणे.

अमृतमहोत्सवी वर्षात महापालिकेकडे एवढा मोठा अवधी असून, त्यांनी काही केले नाही. पालिका आयुक्तांनी माजी महापौर, माजी लोकप्रतिनिधींशी बोलून कार्यक्रम ठेवले पाहिजे होते.

  • शिवा मंत्री, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक, काँग्रेस.

गेल्या तीन वर्षांत प्रशासक राजमध्ये प्रशासकांना लोकप्रतिनिधींचा विसर पडला आहे. प्रशासकांना दोन्ही अधिकार असल्याने त्यांना आपणच नगरसेवक आणि प्रशासन असल्यासारखे वाटत आहे, हे दुर्दैवी आहे.

  • उज्वल केसकर, माजी विरोधीपक्षनेते, भाजप.