डॉक्टरला 93 लाखांचा गंडा घालणाऱ्याला वर्ध्यातून अटक, शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी

गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवून इचलकरंजी शहरातील एका डॉक्टरची 93 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एका बँक कर्मचाऱ्याला पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोहन महादेव साहू (वय 38) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

इचलकरंजीतील डॉ. दशावतार बडे यांना अॅक्सिस स्टॉक एक्स्चेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहायक राशी अरोरा यांनी अधिक परताव्याचे आमिष दाखवत संपर्क साधला. नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत डॉ. बडे यांनी एकूण 93 लाख 35 हजार रुपये या कंपनीच्या खात्यात भरले. याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता, संबंधित फक्त आश्वासने देत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे डॉ. बडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी 22 डिसेंबर 2024 मध्ये चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

त्यानंतर पोलीस तपासादरम्यान यामध्ये संबंधित रक्कम ही कानपूर येथे 38 लाख रुपये, कोलकाता येथे 27 लाख, आसाम येथे 24 लाख आणि नागपूर येथे 4 लाख रुपये अशी रक्कम विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर झाल्याचे निष्पन्न झाले. ही सर्व रक्कम मोहन साहू यांच्या खात्यावर जमा झाल्याचे आणि ती त्यांनी काढल्याचेही स्पष्ट झाले. तसेच, या फसवणुकीत केरशी तावडिया, राशी अरोरा यांच्यासह कंपनीच्या कस्टमर केअर केंद्राचा सहभाग आहे का? याचा तपास सध्या सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोजकर, रणवीर जाधव, अविनाश भोसले आणि प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने केली.