पुणे लोकलमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, मुंबईप्रमाणे डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

>> अंबादास गवंडी

पुणे-लोणावळादरम्यान नोकरी, कामानिमित्त दररोज हजारो महिला प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. परंतु या मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पॅनिक बटण यंत्रणा नसल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड, विनयभंग, चोरी अशा अनेक घटना घडत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वच लोकल गाड्यांमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण बसवणे आवश्यक आहे.

गर्दीची वेळ असो वा शुकशुकाट, चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांनी दिवसेंदिवस महिला त्रस्त होत आहेत. यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांची काळजी वाढली आहे. परंतु पुणे-लोणावळा दरम्यान दिवसभर लोकलच्या ४२ फेऱ्या होत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी डब्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी अतिप्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांवर कोणत्याही प्रकारे बळजबरी होऊ नये, यासाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.

मुंबईत आहेत, पुण्यात का नाही?

मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी काही लोकल गाड्यांच्या डब्यांत सीसीटीव्ही, टॉक बँक बसवण्यात आली आहे. मग पुण्यातील महिलांना अशा सुविधा का मिळत नाही, असा प्रश्न महिला उपस्थित करत आहेत. महिलांवर आत्याचार करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारावर शोध घेऊ शकतो.

पावणे नऊची लोकल नको रे बाबा…

सकाळच्या टप्प्यात महिलांच्या डब्यात जागा कमी पडत आहे. तळेगाव ते पुणे या मार्गावर महिलांना सकाळी व संध्याकाळी उभे राहून प्रवास करावा लागतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात जाणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. यामुळे लोकलचे डबे वाढवले पाहिजेत.

“मी दररोज लोकलने पुण्यात येते. सकाळी दहाच्या लोकलला गर्दी खूप असते. त्यात महिलाच्या डबे हे तीन ठिकाणी जोडले आहेत. त्यामुळे गडबडीत कोणत्या डब्यात चढावे, असा प्रश्न पडतो. अशावेळी तोल गेला, पाय घसरला तर बरे-वाईट होऊ शकते. म्हणून तीनही डब्बे एका ठिकाणी लावण्यात यावेत.”

वनिता गायकवाड, प्रवासी


“महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही अनेकदा निवेदन दिले आहे. सल्लागार समितीत हा विषय कित्येक वेळा मांडला आहे. मात्र, तरीही महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी रेल्वेकडून टाळाटाळ करण्यात येते. रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन महिलांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.”

हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप