गरवारे मेट्रो स्टेशनला गळती

अर्धवट आणि घाईघाईने गेल्यावर्षी वनाज ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनला गळती लागली आहे. त्यामुळे प्रवासी पाय घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे भाजपच्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचे पितळ उघडे पडले आहे.

मेट्रो मार्गाच्या पुढच्या टप्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे उ‌द्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार होते. परंतु, पावसामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. आताही अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशनचे काम अर्धवट आहे. तरीही निवडणुकीच्या तोंडावर अर्धवट कामाचे उ‌द्घाटन करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. परंतु, याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या दरम्यान असणाऱ्या मेट्रो स्टेशनचे काम अजून अर्धवट आहे, तरीही उद्घाटन करण्याची घाई भाजप करीत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

गेल्यावर्षी जेव्हा वनाज ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान मेट्रो मार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळीसुद्धा अनेक ठिकाणी कामे अर्धवट होती. त्याचा परिणाम एका वर्षात नागरिकांना भोगावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अशाप्रकारे निकृष्ट कामे होत असली तरी भाजप मात्र स्वतःचा डांगोरा पिटत आहे. गळक्या मेट्रो स्टेशनमुळे प्रवाशांना ये- जा करताना काही अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.