एडीस डासांमुळे होणाऱया ‘झिका’ विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यतः एडीस डासांद्वारे प्रसारित होणाऱया विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक कीटक व्यवस्थापनअंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेंतर्गत रुग्णाच्या तीन ते पाच किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्ताचे नमुने संकलित करून तपासणी, सर्व रुग्णांना लक्षणांवर आधारित उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी कीटक शास्त्राrय उपाययोजना करण्यात येत आहे.
असे आढळले रुग्ण
राज्यामध्ये ‘झिका’ या विषाणूचे जानेवारी ते 26 जुलैपर्यंत एकूण 28 रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये 24 रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. तर एक रुग्ण सासवड (जि. पुणे) येथे, एक भूगाव (ता. मुळशी जि. पुणे) येथे आणि मे 2024 मध्ये एक कोल्हापूर व एक संगमनेर येथे आढळून आला आहे.
अशी घ्या काळजी
– पाण्याचा साठा होऊ देऊ नये. यासह गावातील सर्व पाणीसाठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झापून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही त्यामध्ये गप्पी मासे किंवा टेमिपह्स या अळीनाशकांचा वापर करावा.
– निरुपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपडय़ांमध्ये राहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.