पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
पुण्यात 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात 5 लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातो. पब नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरु आहेत. 27 पबला कुठलाही परवाना नव्हता. विना परवाना 27 पब चालत असतील तर पोलीस आयुक्त झोपा काढत होते का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधी पक्षनेते यांनी दिलेली माहिती सत्य समजून त्यावर चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले. पुणे कार अपघात प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधीवर झालेल्या चर्चेत वडेट्टीवार बोलत होते.
पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातले आहे. शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे. त्याच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना पुण्यात पाठवावे की नाही याची पालकांना चिंता वाटते. अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली, पोलिसांच्या हे का लक्षात आले नाही? असा सवाल उपस्थित करत धनदांडग्याची कार असल्याने पोलिसांनी सोडली का? असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
आरोपीला जामीन मिळाला. पोलीस निरीक्षकावर कारवाई केली गेली. यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. यामागे राजकीय कारण असून तेही तपासले गेले पाहिजे. दोन निष्पापांचा जीव जातो. तरुण विना परवाना गाडी चालवतो. रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत केली जाते. ससूनमधून ड्रग विकले जाते, याला कुणाचा आशीर्वाद आहे? गृहमंत्र्यानी याबाबत माहिती घ्यावी असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तेथे काय तोडपाणी झालं आहे. नॉन टीपीची दारू पुण्यात किती विकली जाते याची माहिती गृहमंत्र्यानी घ्यावी असे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.