बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ज्या मुद्दय़ावरून देशमुख यांची हत्या झाली त्या पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी बंगल्यावर वाल्मीक कराड याच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा खळबळजनक आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी बैठकीची तारीख आणि वेळ सांगत आज केला. ही माहिती खोटी निघाली तर राजकारण सोडेन, असे आव्हानही त्यांनी दिले. मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी करतानाच या लोकांनी बीडचा बिहार नाहीतर हमास, तालिबान करून ठेवलाय. देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता, असा हल्ला धस यांनी केला.
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीड आणि परभणीनंतर आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडेंच्या आदेशावरूनच पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितली गेली, असे सांगताना धस यांनी या घटनाक्रमाची तारीखवार माहिती दिली.
- 14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली.
- या बैठकीनंतर थेट मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते.
- आपल्याला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने कराडला खटकले आणि त्याने जोशी यांना खडसावले.
- 19 जून रोजी आवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱयांची मुंडे यांच्या मुंबईतील सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली. त्यातून 3 कोटींऐsवजी 2 कोटी रुपये देण्याचे डील ठरले. त्यावर निवडणुकीसाठी त्यातील 50 लाख रुपये तातडीने घेण्यात आले.
दिवसभरात शेकडो धमक्यांचे फोन; अंजली दमानिया यांचा आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्हय़ात सर्व वरिष्ठ पदांवर वंजारी समाजाचे लोक असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यावरून आपल्याला दोन दिवसांपासून धमक्यांचे शेकडो फोन येत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. आपण कुठल्याही समाजाच्या विरोधात बोललो नाही असेही त्या म्हणाल्या. नरेंद्र सांगळे, सुनील फड आदी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या घाणेरडय़ा पोस्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
विघ्ने, वाघला हाकला
पोलीस दलात राहून वाल्मीक कराडची चाकरी करणारे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि मनोज वाघ यांची एसआयटीच्या पथकातून तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
फडणवीस पुन्हा म्हणाले, कुणालाही सोडणार नाही
देशमुख हत्या प्रकरणात न्याय व्हावा अशीच आमची भूमिका असून, कोणालाही सोडणार नाही याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. दमानिया यांनी धमक्यांबाबत तक्रार करावी, पोलीस त्यावर कारवाई करतील, असे ते म्हणाले.
एसआयटीतील दोन अधिकारी वाल्मीकचे खास मित्र
महेश विघ्ने आणि मनोज वाघ हे कराडचे दोन जिगरी यार एसआयटी पथकात असल्यामुळे संतोष देशमुखांना न्याय कसा मिळणार, असा सवाल बीडकर करत आहेत. कराडसोबतचा विघ्ने याचा फोटो आज व्हायरल झाला. विधानसभा निवडणुकीत विघ्ने हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्यासारखा वावरत होता.