आदर्श रस्त्यांमुळे पुणे सुसाट ! सोलापूर-नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा

महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयामुळे शहरातील सोलापूर रोड, नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग अडीच किलोमीटरने वाढला आहे. शहारात पहिल्या टप्प्यात पंधरा प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला गती देण्यासाठी सिव्हिल वर्कवर भर दिल्यानंतर आता महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात रस्त्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. दुसऱ्या टप्प्यातही रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठीच वापरले जातील, यासाठी संयुक्तपणे नियोजन केले जात असून, याबाबतचा लवकरच संपूर्ण आराखडा मांडला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिला केला.

शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने संयुक्तरीत्या 15 रस्त्यांवर केलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. पुढील टप्प्यात या प्रमुख रस्त्यांच्या कडेला असलेली पार्किंग स्पेसही कमी केली जाणार आहे. प्रमुख रस्त्यांवर रिक्षा थांब्यांना बंदी आहे. परंतु यानंतरही परस्पर थांबे केले असतील तर ते बंद करण्यात येतील. बसथांब्यांसमोर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. पूर्वीपेक्षा कारवाईचा वेग दीडपटीपर्यंत वाढविण्यात आला आहे.

रिक्षाचालकांनी बंदी असतानाही बसथांब्यांसमोर रिक्षा उभ्या करू नयेत, असे आवाहनही यापूर्वी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये निदर्शनास आणून देण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. यासोबतच या प्रमुख रस्त्यांवर अन्य अतिक्रमण असल्यास ती काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासन कारवाई करत आहे. सध्या अस्तित्वात असलेले रस्ते पूर्णतः वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास वाहतूककोंडी कमी होऊन गती वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे व्यापक नियोजन करत असल्याचेही डॉ. भोसले आणि मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले.

” शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने संयुक्तरीत्या १५ रस्त्यांची निवड केली. त्यानुसार या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, अनावश्यक गतिरोधक काढणे, वळणावरील जागा ताब्यात घेणे, ड्रेनेजच्या झाकणांचे चेंबर समपातळीत उचलणे, रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेणे, अतिक्रमणमुक्त रस्ते करणे, बीआरटी मार्ग काढणे आदी उपाययोजना केल्या गेल्या.

डॉ. राजेंद्र भोसले,
आयुक्त, पुणे महापालिका.

रस्ते दुरुस्त झाल्याने वाहनांची गती वाढली असून, पूर्वी पर्यायी रस्त्यांचा वापर करणारी वाहनेदेखील या रस्त्यांवरून धावू लागली आहेत, हे एटीएएमएस यंत्रणेच्या दररोजच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. यापुढे जाऊन शहरातील रस्त्यांवर येणाऱ्या लक्झरी बसेसना शहरातील मार्ग आणि पार्किंग नेमून दिल्याने कोंडी कमी झाली आहे.

मनोज पाटील,अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर.