निरवांगीत तरूणाचा खून; सराईतासह पाच जेरबंद

गावकीतील वर्चस्वावरून निरवांगी (ता. इंदापूर) येथे टोळक्याने तलवार, कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून केला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सराईतासह पाचजणांना जेरबंद केले.

उत्तम जालिंदर जाधव (वय ३४, रा. खोरीची, ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार राजू भाळे याच्यासह नाना भाळे, रामदास भाळे, शुभम आटोळे, स्वप्नील ऊर्फ बालाजी वाघमोडे यांना पोलिसांनी भिगवण राशीन रस्त्यावर पाठलाग करून पकडले. हे आरोपी हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत होते.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम जाधव यांना निरवांगी येथे संबंधित आरोपींनी कोयता, तलवार तसेच दगडाने मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या उत्तम यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सातपैकी पाचजणांच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली, विजय टेळकीकर, हवालदार गुलाबराव पाटील आदींनी केली.