अल्पवयीन आरोपीची पोलीस चौकशी

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा बळी घेणाऱया अल्पवयीन आरोपीच्या चौकशीसाठी बाल न्यायमंडळाने पोलिसांना परवानगी दिली आहे. पोलीस शनिवारी (1 जून) त्याची पालकांसमोर दोन तास चौकशी करणार आहेत. त्यामुळे अपघातावेळी गाडीत कोण होते? गाडी कोण चालवीत होते? अपघात नेमका कसा झाला? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मुलगा सध्या बालसुधारगृहात असून, त्याचा मुक्काम 5 जूनपर्यंत तेथेच आहे.

अल्पवयीन मुलाच्या चौकशीच्या वेळी चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर, मुलाचे पालक उपस्थित राहणार आहेत. याबाबत पोलिसांकडून पालकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली आहे. 19 मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने अभियंता तरुण-तरुणीला उडविले होते. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवीत होता. त्याने पबमध्ये मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, या प्रकरणात आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मुलाची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे अर्ज दाखल केला होता. त्याअनुषंगाने आता बाल न्यायमंडळाने मुलाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली आहे.

तपासाची दिशा निश्चित होणार

गुह्यात आरोपी मुलाचे बिल्डर वडील व आजोबा यांना अटक केली आहे. वैद्यकीय चाचणीच्या वेळी ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. या सर्वांची पोलिसांनी अपघाताच्या अनुषंगाने चौकशी केली आहे. मात्र, ज्याच्यामुळे हा अपघाताचा प्रकार घडला, त्याची थेट चौकशी पोलिसांनी अद्यापि केलेली नाही. त्यामुळे आता मुलाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित होऊ शकते.