मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवून दुचाकीला धडक देत तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले, अशी धक्कादायक माहिती तपास अधिकाऱयांनी गुरुवारी न्यायालयात दिली. ती जागा निष्पन्न झाली असून त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत 5 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभाग मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची आज (दि. 30) मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अल्पवयीन आरोपीला ससूनमध्ये तपासणीसाठी 19 मे रोजी आणले तेव्हा सीसीटीव्हीमध्ये डॉ. हाळनोर, घटकांबळे यांच्यासह काहीजण दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्यात रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमातून संवाद झाला असून त्याबाबतचे सीडीआर जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
‘ती’ महिला कोण?
अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, मात्र ती महिला कोण आहे? याचा शोध घेत आहोत, अशी माहिती गुह्यातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला दिली.
रक्ताचे नमुने फेकून दिले नाहीत
अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱयाच्या डब्यात फेकून दिल्याची शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त केली होती. पण आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकून न देता ते कोणाच्या तरी ताब्यात दिले आहेत. त्यामुळे हे नमुने नेमके कोणाकडे दिले? याचा तपास सुरू आहे, असे सरकारी वकील काsंघे यांनी सांगितले.
गुह्यात कलमवाढ
कल्याणीनगर अपघातप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध दाखल असलेल्या गुह्यात भ्रष्टाचार अधिनियमाच्या कलम 7 आणि 7 (अ) या कलमांची कलमवाढ करण्यात आली आहे. लोकसेवकाने शुल्काच्या व्यतिरिक्त पैशांची मागणी केल्यास त्यांच्यावर या कलमांनुसार गुन्हा दाखल होतो.