काळे कृत्य करणाऱ्यांसाठी ससून फाइव्ह स्टार हॉटेल झाले का? नाना पटोले यांचा सवाल

काळे कृत्य करणाऱयांसाठी ससून रुग्णालय फाईव्ह स्टार हॉटेल झालं आहे का, असा सवाल करत, पुण्यात दोन जिवांचा बळी घेणाऱयांच्या रक्ताचे अहवाल बदलणाऱया डॉक्टरांना आमदार आणि मंत्र्यांकडून पाठबळ मिळते. शवविच्छेदन अहवालासह अनेक गैरकृत्यांचे आरोप असणाऱया डॉ. अजय तावरेची अधीक्षक म्हणून शिफारस होतेच कशी, असे सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत.

प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मंत्र्यांनीच अधिष्ठाता काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे का, अशी शंका उपस्थित करत पुण्यातील हिट ऍण्ड रन प्रकरणावर येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज कोल्हापुरात आले असता नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यातील हिट ऍण्ड रन प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस, डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि आता मंत्र्याचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना शिफारस केलेले पत्र आता माध्यमांसमोर आले आहे. त्या पत्रात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिफारशीसह डॉ. अजय तावरे यांना अधीक्षक करण्याचा अभिप्राय दिला आहे. यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना पक्ष फोडाफोडीशिवाय दुसरे कोणतेच काम नाही. पुण्यातील हिट ऍण्ड रन प्रकरणावर नेमलेली चौकशी समिती सदस्यांवरही यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे चौकशी निःपक्ष होईल की नाही, याबाबत शंका आहे. यामुळे हे प्रकरण सभागृहाच्या पटलावर मांडून सरकारला घेरणार असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिला.