पुणे शहर आणि धरणक्षेत्रात बुधवार रात्रीपासून पावसाचे तांडव सुरू आहे. त्यातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये तसेचअनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
मात्र आता पुण्यात पावसाने विश्रांती घेतली असून परिसरातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक ठिकाणी या पूराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये साप, विंचू, किडे, मासे आले आहेत. त्यामुळे पाऊस आणि पूर गेला असला तरी देखील पुणेकरांमध्ये भीती कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये पाऊस आणि पूरामध्ये अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
पुण्यात काल एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी येथे अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते.
परिणामी सोसायटीच्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सोसायटीत पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
आज पाणी ओसारल्याने काही नागरिक घरी परतले आहे. पाण्यात वाहून गेलेल्या संसारांमुळे ते हतबल झाले आहेत.
दुकांनामध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्यामुळे घरातील संसरोपयोगी वस्तु पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. त्यामुळे हे नागरिक हतबल झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा त्यांनी केली आहे.
तसेच पालिकेच्या सफाई कामगारांकडून काही इमारतींच्या आवारातील चिखल आणि गाळ साफ करण्याचे काम सुरू आहे.
अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या ठिकाणी बचाव कार्य राबवले.