गेल्या काही दिवसांपासून घोडेगाव परिसरामध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून, घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात शहरी भागासह खेड्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुणियाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनदेखील अलर्ट मोडवर असून, डेंग्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डेंग्यू, चिकुनगुणियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने रक्तपेढ्यांवरील ताण वाढत असून, रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेट्ससाठी धावाधाव करावी लागत आहे. डेंग्यू आणि चिकुनगुणिया रुग्णांची संख्या वाढत असून, काही रुग्णांना प्लेटलेट्स (पांढऱ्या पेशी), तर काहींना रक्त द्यावे लागत आहे. रक्तातून प्लेटलेट्स वेगळ्या केल्यानंतर त्यांचा पाच दिवसांपर्यंतच साठा करता येतो. त्यामुळे रक्तपेढ्यांना मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्सचा साठा करून ठेवण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेट्स मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन अद्यायावत ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू करावयाचे असल्याने सध्याचे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात जुन्या पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा कमी पडत असून, रुग्णांसाठी केवळ 12 बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे घोडेगाव, काळेवाडी दरेकरवाडी, कोळवाडी कोटमदरा, गिरवली, चास, चिंचोली आदी गावांसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेकडो रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी दररोज येत आहेत. यामध्ये ताप, मलेरिया, डेंग्यू आर्दीची तपासणी केल्यानंतर संबंधित रुग्णांना लक्षणे दिसल्यास उपचारांसाठी रुग्णालयात थांबावे लागत आहे. मात्र, येथे बाराच बेड उपलब्ध असल्याने बहुतेक रुग्णांना बेडच मिळत नाहीत. येथे उपचार घेणारे गरीब, शेतकरी, सर्व – सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने आपल्या रुग्णाचा उपचार ग्रामीण रुग्णालयातच व्हावा, यासाठी आग्रह धरतात. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना अॅडमिट करून घेण्यास डॉक्टर तयार होत नसल्याने त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मागील ऑगस्ट महिन्यात डेंग्यू, मलेरिया आदी 173 रुग्णांची तपासणी केली असता, त्यामध्ये 17 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे दिसून आले. तर, सप्टेंबर महिन्यातील 5 तारखेपर्यंत 70 रुग्णांची तपासणी केली असता, 11 रुग्ण डेंग्यूचे मिळाले अन् इतर विविध आजारांचे रुग्ण निदर्शनास आले. मात्र, संबंधित रुग्णांना येथे बेड उपलब्ध नसल्याने अन् खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अंदाजे 20 हजार रुपये खर्च होत आहे. ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात वेळेवर औषधे उपलब्ध होत आहेत. डॉक्टर, कर्मचारी रुग्णांची व्यवस्थित, योग्यरितीने तपासणी करत आहेत. मात्र, पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने जुन्या पंचायत समितीच्या काही खोल्या रिकाम्या आहेत, तेथे तात्पुरत्या स्वरूपात बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.