गणेशभक्तांना सॅल्यूट! अलोट गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट मोकळी, पुण्यातील Video Viral

गेले 10 दिवस राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. सगळीकडे आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील प्रमुख शहरांसह तालुका आणि गावपातळीवरही गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आवडत्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो गणेशभक्त रस्त्यावर उतरले होते. यावेळी पुण्यात गणेशभक्तांची संवेदनशीलता पाहायला मिळाली.

पुण्यातील टिळक चौकात मुंगी घुसायलाही जागा नसताना गणेशभक्तांनी अवघ्या काही क्षणामध्ये रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून देत जागरूकता दाखवली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गणेशभक्तांचे कौतुक केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


पुण्यात मंगळवार दुपारपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक अद्यापही सुरू असून बुधवारी सकाळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती टिकळ चौकामध्ये पोहोचला. (फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)

त्यानंतर अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन गणपतीची मिरवणूकही वाजतगाजत आली. यावेळी लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी आबाल-वृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.


दरम्यान, पुण्यात सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुरू असलेल्या तरी पाच मानाच्या गणपतींचे मंगळवारी परंपरेनुसार विसर्जन पार पडले. कसब्याचा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी आठच्या आत विसर्जन करण्यात आले.

Ganeshotsav 2024: पाहा पारंपारिक पद्धतीत रंगलेली पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक