मुंढवा येथे बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, तरुणांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, पबविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील हॉटेल लोकल बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित हॉटेल लोकल बार उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहे.

हॉटेल लोकलमध्ये 1 फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता ग्राहकांमध्ये वाद झाला. राहुल कमलेशकुमार जैसवार, रोहित कलमेशकुमार जैसवार, रितीक सुरेश उडता हे किरकोळ जखमी झाले होते. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलला पाठविले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 31 जानेवारीला रात्री सव्वा अकराच्या सुमारास हॉटेल लोकल बार याठिकाणी दोन ग्रुपमधील 5 ते 6 तरुणांमध्ये मोबाईलमध्ये व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून हाणामारी झाली होती. तरुणांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन्ही ग्रुपमधील कोणीही उपचारानंतर तक्रार देण्यासाठी आले नाही. पोलिसांनी केलेली चौकशी व सीसीटीव्ही फुटेज पडताळणीवरून हे प्रकरण समोर आले. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही ग्रुपविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

घटनेबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिली. त्यांनी हॉटेल लोकल बार सील केले. तसेच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी हॉटेलचा खाद्य परवाना रद्द केला आहे.

हॉटेल, बार चालकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.