फर्ग्युसनजवळील हॉटेलात ड्रग्जचा धूर; हॉटेल सील, दोन बीट मार्शल निलंबित, तिघे ताब्यात

pune-hotel

पुणे शहरातील मध्यवर्ती फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज हॉटेलमध्ये तरुणांकडून अमली पदार्थ सेवनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात ड्रग्जची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, हे हॉटेल सील करण्यात आले असून,  शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शलना निलंबित करण्यात आले आहे. तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

पबमध्ये दारू प्यायल्यानंतर बेदरकारपणे वाहन चालवित अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना 19 मे रोजी कल्याणीनगरमध्ये घडली होती. त्यानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभागासह महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील पब चालकांसह हॉटेल मालकांविरुद्ध कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस पबमधील धांगडधिंगा थांबविण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांत पुन्हा एकदा फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज हॉटेलचालकाने पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री येथे 40 ते 50 जणांना पार्टीची परवानगी देण्यात आली होती. रात्री 1.30 नंतर मुख्य दार बंद करून दुसऱया दाराने लोकांना आत सोडविण्यात आले. याप्रकरणी संबंधीत सर्वांना ताब्यात घेण्यात आले. व्हायरल व्हीडिओमध्ये दिसणारा अमली पदार्थ कोणता याचा अमली पदार्थविरोधी पथक तपास करत आहे. कलम 188, महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

पब चालकांसाठीची नियमावली कागदावरच

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी तरुण-तरुणीच्या वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री साडेबारापर्यंतच पब सुरू ठेवावेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पोलीस प्रशासनाने पब चालकांना दिल्या होत्या. कल्याणीनगर अपघात प्रकरणात ब्लॅक आणि कोझी पबच्या मालकासह, व्यवस्थापक, कर्मचाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केले हेते. महिनाभरानंतर त्यांची नुकतीच जामिनावर मुक्तता करण्यात आली.