Pune Crime – बिर्याणीचा एक घासही मिळाला नाही, हॉटेलमध्ये चोरट्यांचं अजब कृत्य!

पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात चोरांनं प्रसिद्ध बिर्याणीचं हॉटेल फोडल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हॉटेलच्या किचनमध्ये तिघे जण मास्क लावून घुसले. संपूर्ण किचन उचकले पण त्यांना बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही. शेवटी बिर्याणी न मिळाल्याने चोरट्यांनी हॉटेलमधलं चिकन लॉलीपॉप आणि 30 रुपयांची चिल्लर चोरली व कोल्ड्रींक पिऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेरॅत कैद झाली आहे. चोरट्यांच्या या विचित्र कृत्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनला आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, चोरट्यांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यामुळे चेहऱ्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र हॉटेल मालकाने या प्रकारणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.