Pune crime news – व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटसद्वारे बदनामी; रागातून मित्राचाच केला खून, कोल्हेवाडीतील खुनाची उकल

कर्जाची रक्कम न भरल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला बदनामीकारक मेसेज ठेवल्याच्या रागातून मित्रानेच हल्लेखोरांना सुपारी देऊन खून केल्याचे उघडकीस आले आहे. फ्लॅटचे कर्ज वापरायला घेऊन त्याची परतफेड न करता मित्राने साथीदारांच्या मदतीने तरुणाचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून केल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी हवेली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे.

सतीश सुदाम थोपटे (वय – 37, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी) असे खून केलेल्याचे नाव आहे. जीवन ऊर्फ बाळा शैलेश जगताप (वय – 27, रा. दत्तवाडी) अक्षय ऊर्फ बाबू बालाजी शेलार (वय – 24, रा. शिवरे, ता. भोर), सोहेल ऊर्फ फुक्या साजिदअली जोरा (वय – 19, रा. शिवरे) देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय – 20, रा. कांजळे, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी भाऊसाहेब सदाशिव किवळे (रा. धायरीफाटा) याचा शोध चालू आहे.

सतीश थोपटे आणि भाऊसाहेब किवळे (रा. धायरी फाटा) यांच्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. सतीशने स्वतःच्या नावावर 18 लाख 50 हजारांच्या कर्जाची रक्कम भाऊसाहेबला काढून दिली होती. कर्ज भाऊसाहेब भरणार असल्याचे ठरले होते. मात्र, काही महिन्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने सतीशने त्याला पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे न मिळाल्याने सतीशने ‘भाऊसाहेव किवळे याने कर्ज भरले नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाहीं’, असा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. त्याचा राग मनात धरून भाऊसाहेबने हल्लेखोर साथीदारांना पाठवून सतीशवर कोयत्याने वार करून खून केला.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. आरोपी खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक केली. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, एपीआय कुलदीप संकपाळ, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय सागर पवार, उपनिरीक्षक संजय सुतनासे, अभिजीत सावंत, हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमीण, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, मंगेश भगत यांनी केली.