जप्त केलेला गुटख्याच्या पोत्यांचा ट्रकच चोरला; दोन नावांचे एकच आधार कार्ड, बँकेत कोट्यवधीचे व्यवहार

पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या पोत्यासह ट्रकची थेट चौकीसमोरूनच चोरी करून मागील पावणेदोन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला राजगड पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्याचे दोन नावांचे एकच आधार कार्ड सापडले आहे.

तसेच त्याने बँकेतून कोट्यवधींचा व्यवहार केला असून, संबंधित तस्करीतील 30 लाखांचा गुटखाजप्तीसाठी आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. निजामउद्दीन महेबूब शेख (वय – 40, रा. लोहियानगर, गंज पेठ, सध्या-मयूरपंख सोसायटी, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

राजगड पोलिसांनी 28 मे 2023 रोजी विमल गुटखातस्करीचे मोठे रॅकेट पकडले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करीत 41 लाख 13 हजारांचा गुटखा, 10 लाखांचा ट्रक असा 51 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुटख्याच्या पोत्यासह ट्रक खेड शिवापूर पोलीस चौकीसमोर श्रीरामनगर (ता. हवेली) उभा केला होता. मात्र, अज्ञाताने पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी निजामउद्दीन शेख हा तेव्हापासून पसार झाला होता. त्याचा शोध राजगड पोलिसांकडून घेण्यात येत होता. त्याला 28 मार्च 2025 मध्ये अटक केली आहे. शेख हा येरवडा, खडक, काळेपडळ पोलीस ठाण्यांतर्गत पाहिजे आरोपी आहे. गुटखा तस्करी प्रकरणात त्याच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, आरोपी शेख तिन्ही गुन्ह्यांत पसार असताना संबंधित पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेने त्याचा शोध का घेतला नाही? गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचे त्याच्यासोबत आर्थिक संबंध आहेत का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निजामउद्दीन शेख याला अटक केली असून, चौकशी केली जात आहे. त्याचा आणखी कोण साथीदार आहे, याचीही माहिती घेत असल्याची माहिती राजगडचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.

गुटखातस्कराला पावणे दोन वर्षांनी बेड्या

गुटख्यासह ट्रकची चोरी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. चार किलोमीटर अंतरावर चोरट्याने गुटखा पोत्याची चोरी करून ट्रक सोडून दिला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी निखिल नहार याच्या गोदामात छापा टाकून कोट्यवधीचा गुटखा जप्त केला होता. चौकशीत त्याने आरोपी निजामुद्दीन शेखने गुटख्याचा पुरवठा केल्याचे सांगितले.

दोन नावे असलेले आधार कार्ड, कोट्यवधींचे ट्रान्जेक्शन

आरोपी निजामुद्दीन महेबूब शेख याच्याकडे दोन नावे असलेले एक आधार कार्ड पोलिसांना मोबाइलमध्ये मिळून आले आहे. तसेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत वर्षभरात आरोपी शेखच्या एचडीएफसी बँक खात्यात तब्बल 8 कोटी 54 लाख 82 हजार 559 रुपयांचे क्रेडिट झाले आहे, तर 7 कोटी 92 लाख 28 हजार 560 रुपयांचे डेबिट झाले आहे. संबंधित बँक खात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या व्यवहाराचा तपास करायचा असल्यामुळे राजगड पोलिसांनी आरोपीची न्यायालयाकडे 8 दिवसांची कोठडीची मागणी केली होती.