शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथे राहत असलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे सव्वा लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. कानातील दागिने काढण्यासाठी चोरट्यांनी अक्षरशः कान ओरबाडले, त्यामध्ये त्या महिलेचे दोन्ही कान तुटले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. दरम्यान या दाम्पत्याला एक मुलगा असून तो व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक आहे.
तुकाराम गणपत आतकरी (वय – 72) आणि त्यांची पत्नी जिजाबाई (वय – 65) अशी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबडून नेल्याने डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्यांना डोक्याला व कानाला बारा टाके पडले आहेत.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळ्यात तुकाराम गणपत आतकरी (वय – 72) व त्यांची पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी (वय – 65) हे दोघेच बंगल्यात राहतात. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे घरात घुसले व लाकडी दांडक्याने दोघा वृद्ध पती-पत्नीला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, कानातील दागिने निघत नसल्यामुळे अक्षरशः ते ओरबडून काढल्याने दोन्ही कान तुटले आहेत. वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच लॉकरमधील दागिने रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला. चोरट्यांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे हे वृद्ध दाम्पत्य बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तुकाराम आतकरी शुद्धीवर आल्यावर त्यांनी शेजारी घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्वरित तेथे धाव घेतली. त्यांनी ही माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला कळविली.
काही वेळातच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून डॉग स्कॉड व दरवाजाचे ठसे घेण्यासाठी फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे. आय. पाटील करीत आहेत.