इंटरनेटद्वारे ‘छावा’ चित्रपटाचे प्रक्षेपण; नाशकात एकाला अटक

crime

‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या व्हिडीओच्या 1818 लिंक विनापरवाना इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, यूटय़ूब, गुगलद्वारे प्रसारित करून मॅडॉक फिल्म व ऑगस्ट एंटरटेन्मेंट कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्या प्रकरणात दक्षिण सायबर पोलिसांनी नाशिकमधून एकाला पकडले. या गुह्यातील ही दुसरी अटक असून याआधी पुण्याच्या दौंड येथून 26 वर्षीय तरुणाला पकडण्यात आले होते.

14 फेब्रुवारी ते 20 मार्च यादरम्यान अज्ञात इसमांनी ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या व्हिडीओच्या तब्बल 1818 लिंक विनापरवाना इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मिडियाद्वारे प्रसारित केल्या होत्या. यामुळे मॅडॉक फिल्म व ऑगस्ट एंटरटेन्मेंट कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. याविरोधात ऑगस्ट एंटरटेन्मेंट कंपनीचे सीईओ रजत हकसर यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून नाशिकच्या मुंबई नाका येथील दत्ता मेट्रिक कंपनी कॉलनीत राहणाऱया विवेक धुमाळ (26) या तरुणाला पकडले.