परप्रांतीय कामगाराचा मराठी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

सिक्युर-1 कंपनीत काम करणाऱ्या इकराम पाठक याला चुकीचे काम करण्यापासून तंबी दिली म्हणून त्याने कंपनीचे डय़ुटी इन्चार्ज राजीव डांगे (41) यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाठक याने डोके, पाठ, हातावर रॉडचे फटके मारल्याने डांगे यांच्या डोक्यावर गंभीर इजा झाली.

राजीव डांगे हे गेल्या दोन वर्षांपासून सिक्युर-1 कंपनीत कामाला असून ते सांताक्रुझ एअर कार्गो टर्मिनल या ठिकाणी डय़ुटी इन्चार्ज या पदावर काम करीत आहेत. सिक्युर कंपनीचे सुरक्षा रक्षक तसेच सुपरवायझर यांच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम डांगे करत असतात. डांगे यांच्या नियंत्रणाखाली काम करणारा सुपरवायझर इकराम पाठक हा सॅक येथे येणाऱ्या कार्गो वाहन चालकांकडून जेवणासाठी तसेच पान-बिडीसाठी पैसे घेतो. शिवाय कामावर असताना दारू ढोसून असतो अशी माहिती डांगे यांना मिळाली होती. त्यामुळे डांगे यांनी एक महिन्यापूर्वी पाठक याच्याबाबत सिक्युर-1 कंपनीचे व्यवस्थापक सहदेव वानखेडे व मियाल सिक्युरीटीचे डय़ुटी व्यवस्थापक संतोष दुबे यांना सांगितले होते. दरम्यान, 1 जानेवारी रोजी मियाल सिक्युरिटीचे संतोष दुबे यांनी पाठकशी भेट घेऊन त्याच्याशी बातचीत केली. त्याच संध्याकाळी इकराम पाठक हा सांताक्रुझ येथील एअर कार्गो टर्मिनल येथील एण्ट्री गेटजवळ असलेल्या सिक्युरीटी पास सेक्शन केबिनमध्ये आला आणि तेथे काम करत असलेल्या राजीव डांगे यांच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी डांगे यांच्या तक्रारीवरून मुजोर इकराम पाठक या परप्रांतीय कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

कार्यालयात मराठीत बोलायचं नाही; काय करायचं ते करा पुण्यात परप्रांतीय मॅनेजरची मुजोरी

पुणे शहरातील वाकडेवाडी येथे परप्रांतीय मॅनेजरची मुजोरी समोर आली आहे. वाकडेवाडी येथील एअरटेल शोरूममधील एका परप्रांतीय टीम लीडरने मराठी कर्मचाऱ्यांवर अरेरावी केली. ऑफिसमध्ये हिंदीत बोलण्याची सक्ती केली. मराठीत बोललात तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी दिली आहे. तसेच मराठी कर्मचाऱ्यांचे पगारही रखडवून ठेवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.