Pune crime news – कात्रीने वार करून पत्नीचा खून, व्हिडीओ व्हायरल; पतीचा निर्दयीपणा, सर्वत्र संताप

कौटुंबिक वादातून शिवदास तुकाराम गिते याने पत्नी ज्योती हिचा कात्रीने गळ्यावर वार करून खून केला. खुनानंतर या घटनेचा व्हिडीओ काढत पत्नीच्या नातेवाईकांवर आरोप केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात शिवदास हा ज्योतीला का मारले हे सांगत आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार सुरू असताना त्यांचा सहा वर्षांचा मुलगादेखील खोलीत होता. त्यानंतर शिवदास हा स्वतः खराडी पोलीस ठाण्यात हजर झाला. खराडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत ज्योती यांची बहीण सविता नागरगोजे (वय – 37, रा. लोणीकाळभोर, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवदास तुकाराम गिते (वय – 37, रा. बीड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तुळजाभवानीनगर खराडी येथे बुधवारी (22) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये शिवदास आणि ज्योती या दोघांचा विवाह झाला होता. दोघांना सहा वर्षांचा मुलगा आहे. शिवदास हा शिवाजीनगर न्यायालयात करार तत्त्वावर स्टेनोग्राफर म्हणून काम करत होता. तर ज्योती कपडे शिवण्याबरोबरच धुण्याभांड्याचे काम करीत होती. शिवदास ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ज्योती आणि शिवदास झोपेतून उठले होते. त्यावेळी दोघांत घरगुती कारणातून वाद झाला. त्यावर संतापलेल्या शिवदासने मशीनवर ठेवलेली कात्री हातात घेऊन सपासप ज्योतीच्या गळ्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ज्योती पडली होती. मुलगा घरात होता. त्याच्यासमोर शिवदासने क्रूरपणे ज्योतीला संपविले. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवर व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये ज्योतीला त्याने का मारले हे सांगत आहे. त्यानंतर शिवदास स्वतः मुलासह खराडी पोलीस ठाण्यात हजर झाला. खराडी पोलीस तपास करीत आहेत.