
नशेसाठी वापरली जाणारी आणि छुप्या बाजारात सहजरीत्या उपलब्ध होणारी भांगयुक्त ‘बंटा’ गोळी ‘आयुर्वेदीक औषधी’चे लेबल लावून विकणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शिवणे भागातून अटक केली. त्याच्याकडून 4 किलो 80 ग्रॅम वजनाची 24 मोठी पॅकेट जप्त केली. या गोळीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून, अनेक विद्यार्थी याच्या आहारी जात आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंढवा भागात एका अल्पवयीनाने बंटा गोळी खाल्ल्यानंतर नशेत चार ते पाच वाहनांची तोडफोड केली होती.
दिनेश मोहनलाल चौधरी (30, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चौधरी हा मूळचा राजस्थानचा असून, मागील पाच वर्षांपासून शिवणे भागात किराणा दुकान चालवतो. नशेची सवय लागलेल्या तरुणांमध्ये भांगयुक्त गोळी ही ‘बंटा’ गोळी म्हणून परिचित आहे. बंटा हा कोडवर्ड वापरून शहरातील अनेक टफ्ऱ्यांवर छुप्या पद्धतीने ही गोळी विकली जाते.
सामान्य नागरिकांना ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. मात्र, नशेखोर आणि कोडवर्डचा वापर करणाऱ्यांनाच ती दिली जाते. विशेष म्हणजे अगदी दहा ते पंधरा रुपयांना एक गोळी विकली जाते. पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अंमलदार सचिन माळवे, संदीप शिर्के, विपून गायकवाड यांच्यासह पथकाने चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 किलो 800 ग्रॅम वजनाच्या सुमारे 10 हजार 800 रुपयांच्या बंटा गोळ्यांची पाकिटे जप्त केली आहेत.
पोलिसांकडून शोधमोहीम
शिवणे भागात अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी बंटा गोळ्या असलेली पाकिटे जप्त केली. त्यावर विजयावटी आयुर्वेदीक औषधी असे लिहिलेले आढळले. त्यामुळे आयुर्वेदीकच्या नावाखाली विक्रेत्यांकडून अशा भांगयुक्त गोळ्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून अशा विक्रेत्यांचा शोध सुरू आहे.