गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीच्या कालावधीत साखळी चोरटे पुन्हा डोके वर काढतात. या कालावधीत होणाऱ्या गर्दीची संधी साधून चोरटे अक्षरशः धुमाकूळ घालतात. त्यामुळे खरेदीसाठी जाताना दागिन्यांचा मोह टाळण्याचे आवाहन पोलीस वारंवार करतात. मात्र, त्याकडे होणारे दुर्लक्ष महिलांना महागात पडते.
दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी खडकी बाजारमध्ये गेलेल्या महिलेचे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी नंदा ओव्हाळ (वय 31, रा. दापोडी, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. चोऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. खुनी, खुनीहल्ला, बलात्कार, खंडणी उकळणे, अपहरण करून लुटणे हे रोजचेच बनले आहे. त्यातच महिलांचे दागिने हिसकावण्याच्या साखळी चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. महिला विशेषतः ज्येष्ठ महिलांना ‘टार्गेट’ करून हे चोरटे त्यांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे मंगळसूत्र, चेन आणि दागिने हिसकावून नेत आहेत.
भरधाव वेगात मोटारसायकलवरून येणारे हे चोरटे क्षणार्धात सोन्याचे मंगळसूत्र, गंठण आणि$ दागिने हिसकावून नेतात. त्यामुळे फिरायला जाताना तरी दागिन्यांचा मोह टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘सकाळी किंवा रात्री फिरायला जाताना सोन्याचे दागिने, किमती ऐवज जवळ बाळगू नका, दागिने घालणार असल्यास साडीच्या पदराने किंवा ओढणीने ते झाकावेत, त्यामुळे अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यास पोलिसांना मदत होईल.
नागरिकांचेही सहकार्य हवे
घरफोडी, चोऱ्या रोखण्यासाठी घरात मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्या चांदीचे दागिने ठेवू नका, सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसवा, नेमण्यासाठी पोलीस वारंवार आवाहन करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः उपनगरांमधील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन पोलीस हे आवाहन करत असतात. मात्र, त्याकडे हे नागरिक पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे रोज घडणाऱ्या घटनांवरून निदर्शनास आले आहे.
पतीसोबत ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना, दूध आणायला जातानाही महिला किमान लाखभर रुपयांचे मंगळसूत्र, गंठण किंवा सोन्याच्या साखळ्या घालूनच जातात. मोटारसायकलवरून येणारे चोरटे हे दागिने अगदी सहज हिसकावून पसार होतात. विशेष म्हणजे शहर परिसरातील उच्चभ्रू वसाहती, सोसायट्या, बंगल्यांमध्येच या चोऱ्या, घरफोडी होतात. विविध खासगी, सरकारी कंपन्यांमधील अनेक उच्चशिक्षित वरिष्ठ, उच्चपदस्य निवृत्त अधिकारी, व्यावसायिक तेथे राहतात. रोजच्या घडामोडींची त्यांना पूर्णपणे माहिती असते. मात्र, तरीही बाहेर जाताना मौल्यवान ऐवज, रोकड बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास ते टाळाटाळ करतात. नागरिकांनी खबरदारी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.