
पुणे शहरातील बिबवेवाडीतून एका हिरे व्यापाऱ्याचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटुंबीयांसह बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहे. त्यांच्या पती हिरे व्यापारी असून, ते हिरेजडीत दागिने तयार करतात. व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर मुलगी आणि पत्नीला त्यांनी घरी सोडले. काही कामानिमित्त लष्कर भागात जाणार असल्याचे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. अनोळखी व्यक्तीने ‘मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुरजी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे’ असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली.
सोमवारी सायंकाळी 2 कोटींची मागितली खंडणी
अपहरणकर्त्यांच्या फोनमुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. तपासादरम्यान व्यापारी हे सोमवारी सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. नवले पूल परिसरात व्यापाऱ्याची दुचाकी मिळून आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले होते का, अजून कोणत्या कारणातून त्यांचे अपहरण झाले का, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत.