आपल्याकडे दैवीशक्ती असून, करणी, जादूटोणा दूर करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबांचे उद्योग अद्याप सुरूच आहेत. यापूर्वी अनेकवेळा भोंदूबाबांचे ‘प्रताप’ उघडकीस आले असले तरी अजूनही त्यांची चलती सुरू आहे.
दैवीशक्ती अवगत असल्याची बतावणी करून भोंदूने महिलेचा चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात नुकतीच घडली. या भोंदूबाबावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. भोंदूबाबाने महिलेचा विश्वास संपादित करून मला दैवीशक्ती अवगत आहे. माझ्या अंगात देव संचार होतो, असे सांगून भोंदूने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर महिला आणि तिची दोन मुले घरात असताना भोंदूबाबाने महिलेला चाकूचा धाक दाखविला. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत. या घटनेमुळे भोंदूबाबांचे ‘उद्योग’ समोर आले आहेत.
करणीबाधा दूर करण्याबरोबरच पुत्रप्राप्ती, गुप्तधन काढून देण्याबरोबरच असाध्य आजार मंत्राने बरे करण्याच्या बतावणीने मांत्रिक, भोंदूबाबा अनेकांना अक्षरशः कोट्यवधींचा गंडा घालत आहेत. विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुरोगामी असलेल्या पुणे शहरात अंधश्रद्धेचे ‘भूत’ मात्र अद्यापि कायम आहे, हे सातत्याने उघडकीस येणाऱ्या मांत्रिक, भोंदूबाबांच्या उद्योगांवरून स्पष्ट झाले आहे. याबरोबरच फ्लॅट, दुकान, मॉल्स आणि महागड्या मोटारींना नजर लागू नये म्हणून काळ्या बाहुल्या, लिंबू-मिरची, छोट्या कोल्हापुरी चपलांची विक्री जोमात सुरू आहे. नजर लागू नये म्हणून घराच्या दारावर, मोटारीच्या पुढे, लहान मुलांच्या उशाखाली खोटी कोल्हापुरी चप्पल अनेकजण ठेवतात. रोज साधारण दहा ते पंधरा चपलांची विक्री होते. वास्तूसाठी काळ्या बाहुलीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
बाहुली, लिंबू-मिरची, छोट्या चप्पलची विक्री जोमात सुरू असते. घरात सुखशांती नांदावी, पत्नीवरील भानामती नाहीशी होऊन पुत्रप्राप्ती होण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून पुण्यातील एका व्यावसायिकाने पत्नीला चक्क सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याचा संतापजनक प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. विद्येच्या माहेरघरात आता लक्ष्मी वास करू लागली आहे.
पूर्वी खेड्यापाड्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत आता मोठ्या शहरामधील नागरिकांच्या विशेषतः सुशिक्षित नव्हे, तर डॉक्टर, इंजिनिअर यांसारख्या उच्च शिक्षितांच्या मानगुटीवर बसले आहे. अशा अनेक घटना सातत्याने उघडकीस येत असल्या, तरी त्यापासून धडा घेण्याच्या तयारीत कोणी नाही. मात्र, ज्या घटना उघडकीस येतात, त्याच्या दुप्पट- तिप्पट घटना समोर येत नाहीत. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो म्हणून सर्वत्र नाचक्की होईल म्हणून या मांत्रिक, भोंदूबाबांच्या उद्योगाला बळी पडलेले शांत राहतात. क्वचित एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास या प्रकारची वाच्यता होते.