जमिनीच्या वादातून कोंढावळ्यात तरूणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न; 15-16 जणांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असतानाच आता जिल्ह्यातील राजगड तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या मुलीला टोळक्याने जेसीबीच्या साह्याने जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29 मे रोजी कोंढावळे खुर्द (ता. राजगड) गावात घडली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कायदा सुव्यस्थेववर लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले असून, यत्रणेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.

तरूणीला जिंवत पुरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 15 ते 16 जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे (रा. कोंढावळे खुर्द ) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रणाली खोपडे (वय- 21) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढावळे खुर्द येथील गट नंबर 114 मध्ये आरोपी संभाजी खोपडे आणि कमल खोपडे यांच्या वाद असून पोलिसांनी दोन्ही कुटुंबियात मध्यस्थी केली होती. दरम्यान बुधवारी 29 मे रोजी कमल खोपडे आणि त्यांच्या मुली प्रणाली व प्राजक्ता शेतात काम करीत होत्या. त्यावेळी आरोपी संभाजी खोपडे हा 15 ते 16 जणांसह जेसीबी व ट्रॅक्टर घेऊन शेतात आला.

‘ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही जमिनीत थांबू नका,’ असे त्याने फिर्यादी तरूणीला धमकाविले. त्यावेळी प्रणालीने विरोध केला असता, आरोपीने तिला जेसीबीने ढकलून देत अंगावर माती टाकून जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुलीची आई कमल आणि बहिणीने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून प्रणालीला वाचवले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील गुंडाकडून धमकी दिल्याचा आरोप

शिवडीतील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल ऊर्फ राजूभय्या घटनास्थळी उपस्थित होता. त्याने दहशत निर्माण करून संबंधित मुलीला पुरण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईला धमकी दिल्याचा आरोप कमल खोपडे कुटुंबियांनी केला आहे.

पसुरेत बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची घटना ताजी

जमिनीच्या वादातून तरूणीला जेसीबीच्या साहाय्याने शेतात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, भोर तालुक्यात भाटघर धरण खोर्‍यातील पसुरेत जमिनीच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाने बंदुकीतून दोन फैरी झाडत स्थानिक शेतकर्‍यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

“जमिनीच्या वादाप्रकरणी दोन्ही कुटूंबियात समझोता करण्यात आला होता. मात्र, आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने तरूणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केला आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास केला जात आहे.”

– नितीन खामगळ, सहायक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस ठाणे