इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत 19 लाख 92 हजार 615 रुपये किमतीचा 132 किलो 841 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे.
या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेल्या तीन लाख रुपयांच्या टेम्पोसह एकूण 23 लाख 22 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल व दोन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, 26 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. नवनाथ राजेंद्र चव्हाण (वय – 30, रा. शेटफळ हवेली ता. इंदापूर), शिवाजी जालिंदर सरवदे (वय – 30, रा. निरा नरसिंहपूर, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार पुंडलिक गावडे, सहायक पोलीस फौजदार प्रकाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, फौजदार दत्तात्रय लेंडवे, हवालदार सलमान खान, अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर, गजानन वानोळे यांनी ही कामगिरी केली.
ते म्हणाले की, इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना शेटफळ हवेली गावच्या हद्दीत दोन इसम हे मालवाहतूक टेम्पोमधून विक्रीसाठी गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिली. कोकणे यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या पथकाला कल्पना देऊन कारवाई करण्याची सूचना दिली. आरोपींकडून 19 लाख 92 हजार 615 रुपयांचा गांजा, माल वाहतूक करणारा टेम्पो, दोन मोबाईल असा 23 लाख 22 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.