शिवरायांची बदनामी करणाऱ्या राहुल सोलापूरकरला बक्षिसी, पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासाठी घेतला सल्ला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणारा अभिनेता राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई होण्याऐवजी पुणे महापालिकेने त्याला बक्षिसी दिल्याचे समोर आले आहे. त्याच्या सल्ल्याने महापालिकेने सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार केला आहे. मात्र सद्यस्थितीत कोणतीही समिती स्थापन केलेली नसून केवळ ज्या सांस्कृतिक विभागातील तज्ञांशी चर्चा केली, त्यांचीच नावे नमूद केल्याचे सांगत महापालिकेकडून आता सारवासारव केली जात आहे.

महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार केले आहे. ते धोरण मान्यतेसाठी स्थायी समिती समोर ठेवले आहे, मात्र हे धोरण तयार करण्यापूर्वी आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी चर्चा केली नसल्याने महापालिका आयुक्तांनी उपायुक्तांना झापल्याची चर्चा अधिकाऱयांमध्ये होती. तसेच महापालिकेने हे धोरण बनवताना सल्लागारतज्ञ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱया राहुल सोलापूरकरचा सल्ला घेतला होता. हे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केल्यानंतर सर्व स्तरातून महापालिका प्रशासनावर टीका झाली. त्यानंतरआता सारवासारव केली जात आहे.

पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत शहरासाठी सांस्कृतिक धोरण बनविण्याकरिता डिसेंबर 2023 मध्ये सल्लागारची नेमणूक केली होती. संबंधित सल्लागाराने पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध तज्ञांशी चर्चा करून सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार केला. तो मसुदा सांस्कृतिक विभागाकडे जून 2024 मध्ये सादर केला. या मसुद्यामध्ये ज्या सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली त्या व्यक्तींची नावे मसुद्यामध्ये नमूद केली आहेत. यामध्ये सद्यस्थितीत कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सोलापूरकरला कुणाचा राजाश्रय? – जितेंद्र आव्हाड

पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये ‘थोर’ इतिहास संशोधक राहुल सोलापूरकरला संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱयावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर पोस्टद्वारे म्हटले आहे.

सदर सांस्कृतिक धोरण सादर केले असून त्यावर सर्वांशी चर्चा करूनच अंतिम मसुदा तयार करण्यात येईल. तसेच हे धोरणही मान्य करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत कोणतीही समिती नेमण्यात आलेली नाही. – सुनील बल्लाळ, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका