स्वारगेट बलात्कार प्रकरण, नराधम दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल

स्वारगेट बस स्थानकातून गावी निघालेल्या तरुणीला चुकीच्या बसची माहिती देऊन तिला निर्मनुष्य ठिकाणी बसमध्ये नेऊन बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेविरुद्ध पोलिसांनी 893 पानांचे दोषारोपपत्र शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल केले.

स्वारगेट एसटी स्थानकातून गावी चाललेल्या 27 वर्षीय तरुणीवर नराधम दत्तात्रय गाडे याने 25 फेब्रुवारीला सकाळी सहाच्या सुमारास बसमध्येच बलात्कार केला होता. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने 52 दिवसांत तपास पूर्ण केला आहे. विविध पातळ्यांवर तपास करीत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड, उपनिरीक्षक पूनम पाटील यांनी प्रकरणाचा तपास केला.