ऐन दिवाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना औंधमधील महापालिका वसाहतीत घडली. तसेच टोळक्याने महिलेसह तरुणावर शस्त्राने वारदेखील केले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी साहिल पवार (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) याने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर ओंकार नरवडे (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध), पियूष (21), नंदन (दोघे रा. पीएमसी वसाहत, औंध), आर्यन मोरे (20, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. टोळक्याने केलेल्या तोडफोडीत दहा दुचाकी आणि तीन रिक्षांचे नुकसान झाले. तक्रारदार साहिल याच्याशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी महापालिका वसाहतीत आले. त्यांनी साहिल आणि त्याची आई दीपाली यांना शिवीगाळ केली. दीपाली यांना मारहाण करून त्यांच्यावर वार केले. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सनी सोनवणे याच्यावर आरोपींनी वार केले.