
बनावट डील करण्याच्या नावाखाली पुण्यातील उद्योगपतीला बिहारमध्ये बोलावून घेतले. पाटणा विमानतळावर उतरताच उद्योगपतीचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 90 हजार रूपये ऑनलाईन वर्ग करून घेत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या टोळीमध्ये तीन ते चार जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
लक्ष्मण साधू शिंदे (55) असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. त्यांच्या सासवड आणि दौंड परिसरातील कासुर्डी याठिकाणी कास्टिंगच्या कंपन्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे हे रत्नदीप कास्टिंग कंपनीचे संस्थापक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना बिहारमधील एकाने मेल पाठवून कोटय़वधी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात चर्चा करण्यासाठी पाटणा येथे बोलाविले होते. त्यानुसार 11 मार्चला शिंदे विमानाने पुण्यातून पाटणा येथे पोहोचले. त्यावेळी शिंदे यांनी बिहारमध्ये पोहोचलो असून झारखंडला चाललो आहे, असा निरोप मुलीला दिला. त्याठिकाणी खाणकाम प्लॅण्टमध्ये मशिनरीचे काम पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांसह कोणाशीही संपर्क झाला नाही. तसेच त्यांच्या फोनवरून पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. मात्र, व्यावसायिक चर्चेआधीच चोरटय़ांनी त्यांना मोटारीत बसवून अपहरण केले. त्यांना निर्मनुष्य ठिकाणांवर नेऊन बँकेतून 90 हजार रुपये ऑनलाइनरीत्या वर्ग करण्यास भाग पाडले. रक्कम वर्ग करून घेत त्यांची हत्या केल्याची माहिती पाटणा पेलिसांनी दिली आहे.
100 कोटींच्या ऑर्डरची ऑफर
उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना चोरटय़ांनी झारखंडमधील खाण उपकरणांशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांची मेलद्वारे ऑर्डर दिली होती. त्यानंतर चर्चेसाठी त्यांना बिहारमधील पाटणा येथे आमंत्रित केले होते. कंपनीला मोठी ऑफर मिळत असल्यामुळे शिंदे यांनी बिहार गाठले. मात्र, चोरटय़ांनी त्यांचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले.