
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (37) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तीन नव्या कलमांची वाढ करण्यात आली आहे. पीडितेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि दोन वेळा जबरदस्तीने संभोग करणे या कारणांमुळे हे कलम वाढविण्यात आले आहेत.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर 12 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठड़ी सुनावली होती. बुधवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत एका 26 वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी सॅम्पल घेतले आहेत. या गुह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे. तसेच, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला त्याच्या मूळ गावी गुनाट (ता. शिरूर) येथेदेखील नेले होते.