
स्वारगेट एसटी डेपोतील ‘निर्भया’कांड प्रकरणात नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला बेडय़ा ठोकण्यात पुणे पोलिसांना तीन दिवसांनी यश आले. गुणाट गावातील ग्रामस्थांसह 500 पोलिसांचा फौजफाटा, डॉग स्क्वॉड, ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवून उसाच्या शेतात लपलेल्या गाडेच्या गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मुसक्या आवळल्या. तीन दिवसांत फरार गाडेने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रकवर चालविला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाने गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मंगळवारी (दि. 25) पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या ‘निर्भया’कांडने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. पीडित तरुणी (वय 26 वर्ष) फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना ताई… ताई म्हणत, दिशाभूल करत गाडेने तिचा घात केला. एसटीचा वाहक असल्याची बतावणी करत फलटणऐवजी भलत्याच बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सकाळी नऊच्या सुमारास पीडितेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
तुझा खेळ संपलाय…
तरुणीवर अत्याचार केल्यानंतर गाडेने शिरूर तालुक्यातील आपले गुणाट गाव गाठले. तिथे तो उसाच्या शेतात लपला होता. पोलिसांना सुगावा लागताच 500 जणांच्या पथकासह त्याचा शोध सुरू झाला. गुणाटच्या गावकऱयांनीही या मोहिमेत भाग घेतला. पुणे ग्रामीण पोलिस दलातील अमलदार संजू जाधव यांनी ड्रोनमध्ये असलेल्या माईकद्वारे त्याला शरण येण्याचे आवाहन केले. ‘दत्तात्रय पळण्याच्या तुझ्या सगळ्या वाटा बंद केल्या आहेत. पोलिसांच्या स्वाधीन हो, तुला काहीही होणार नाही, पोलिसांनी तुला घेरले आहे, पळून जाऊ नको’ असे पोलीस माईकद्वारे सांगत होते. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास गाडे उसाच्या शेताबाहेर आला. स्थानिक तरुण गणेश चव्हाण याने त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न, पण दोर तुटला…
गाडेने यादरम्यान एकदा विषप्राशन तर दोन वेळा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु लिंबाच्या झाडाला बांधलेला दोर गळफास घेताच तुटला.
गावकऱ्यांचा सत्कार होणार
डॉग स्क्वॉडने आरोपीचा माग काढला. तसेच, आरोपीला पकडण्यासाठी गुणाट येथील गावकऱयांनी पोलिसांना मोठी मदत केली आहे. दुचाकीवर अनेक तरुण दिवसरात्र पोलिसांसोबत फिरत होते. पोलीस पाटील, सरपंच, तरुण, ज्येष्ठांची मोठय़ा मदतीमुळेच आम्हाला आरोपीला पकडणे शक्य झाले. त्यासाठी मी स्वतः गुणाट गावी जाऊन नागरिकांचा सत्कार करणार आहे. तसेच, ज्याने आरोपीचे शेवटचे लोकेशन आणि योग्य माहिती दिली, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हा खटला फास्ट ट्रकवर चालविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
कदमांची फाफलली
वादग्रस्त वक्तव्यानंतर बोलताना योगेश कदम यांची फाफलली. पोलिसांनी जी माहिती मला दिली तेच मी बोललो, अशी सारवासारव योगेश कदम यांनी केली. महिलांच्या अत्याचाराबाबत आमच्या सरकारची झीरो टॉरलन्स पॉलिसी आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मी सांगितले, असे ते म्हणाले.
सरकार जनतेवर असे निकृष्ट दर्जाचे मंत्री लादत असेल तर देवानेच जनतेची मदत करावी. मूर्ख विधाने न करता बलात्कार करणाऱयाला दहशतवाद्याप्रमाणे वागवायला हवे. त्यांना मंत्रीपदावरून हटवले पाहिजे. – आदित्य ठाकरे
गृहराज्यमंत्री पीडित मुलीलाच खोटे ठरवत आहेत आणि आरोपीला क्लीन चिट देत आहेत. सरकारने योगेश कदम व संजय सावकारे यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी. – विजय वडेट्टीवार
योगेश कदम यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. नवीन मंत्री असोत किंवा लोकप्रतिनिधींनी अशा प्रकरणात बोलताना अधिक संवेदनशीलतेने बोलले पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो. – देवेंद्र फडणवीस