एकाच मुलीचे दोघांशी लग्न, व्हॉट्सऍप स्टेटसमुळे भांडाफोड

एकाच मुलीचे दोन तरुणांबरोबर लग्न लावून पैसे उकळले. मात्र, दुसऱया लग्नाचे फोटो व्हाटसअॅपचे स्टेटस ठेवल्यानंतर लग्न लावणाऱया टोळीचा भांडाफोड झाला. आळंदी पोलिसांनी नवरीसह एका एजंटला अटक केली असून तिघे पसार झाले आहेत. हा प्रकार गुरुवारी आळंदी येथे उघडकीस आला.

नवरी मुलीसह भावेश रवींद्र पाटील या दोघांना अटक केली आहे. दोन महिला आणि एक पुरुष असे तीन एजंट फरार झाले आहेत. याप्रकरणी राहुल दशरथ कनसे (वय-37, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेबाबत आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून चैतन्य खाडे नावाच्या तरुणाबरोबर आरोपी मुलीचे आळंदी येथे लग्न लावले. लग्नासाठी आरोपींनी चैतन्य याच्याकडून पैसे उकळले. काही दिवसांतच नवरीसह सर्व आरोपी पळून गेले. त्यानंतर आरोपीने लग्न झालेल्या मुलीचे निशा दत्ताराम पाटील या नावाने बनावट आधार कार्ड तयार केले. फिर्यादीच्या भावाबरोबर आरोपी निशाचे लग्न आळंदीत झाले. तत्पूर्वी या लग्नासाठी फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी 1 लाख 55 हजार रोख, तर आरोपी भावेश पाटील याच्या खात्यावर 95 हजार असे अडीच लाख रुपये घेतले. लग्नानंतर फिर्यादीच्या नातेवाईकांनी लग्नाचे पह्टो व्हाटसअॅप स्टेटसवर ठेवले. मात्र, हे पह्टो पहिले लग्न झालेल्या चैतन्य खाडे यांच्या नातेवाईकांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीशी संपर्क साधला आणि लग्न लावून पैसे उकळणाऱया या टोळीचा भांडापह्ड झाला.