पुण्यातील कोथरूड स्टँडजवळ एक भीषण अपघात झाला आहे. रस्ता ओलांडत असताना एका तरुणीला डम्परने धडक दिली. या अपघातानंतर तरुणीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून तरुणी रस्ता ओलांडत होती. यावेळी अचानक समोरून येणाऱ्या एका भरधाव डम्परने तरुणीला धडक दिली. या धडकेनंतर तरुणीच्या डोक्यावरून डम्परचे चाक केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर डम्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली.
आरती सुरेश मनवाणी (23) असे त्या मृत तरुणीचे नाव असून ती अमरावतीची रहिवासी आहे. तिच्या अपघाताची माहिती पोलिसांनी तिच्या वडिलांना दिली असून डम्पर चालकाला देखील ताब्यात घेतलं आहे. डम्पर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.