पुजाऱ्यासह शिष्यांना डांबून पाच कोटी खंडणीची मागणी

मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकला नेऊन पुजाऱ्यासह त्यांच्या ७ शिष्यांना डांबून ठेवून 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीतील तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. कर्नाटक स्थानिक पोलीस आणि बिबवेवाडी पोलिसांनी कामगिरी केली असून, आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रामू अप्पाराय वळून (वय 29, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (वय 20) आणि हर्षद सुरेश पाटील (22, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बजरंग तुळशिराम लांडे (51, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

बजरंग लांडे हे पुजारी असून, दि. 29 जुलैला आरोपी त्यांचा मुलगा स्वप्नीलला घरी येऊन भेटले. त्यांनी विजापुरात हर्षद पाटीलच्या घराची पूजा करायची आहे. मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे, असे सांगून कर्नाटकात त्यांना बोलावले. त्यानुसार लांडे हे 7 शिष्य घेऊन कर्नाटकमध्ये गेले. तिथे घराची पूजा अथवा मूर्ती प्रतिष्ठापनेची तयारी दिसली नाही. आरोपींनी त्यांना खोलीत डांबून ठेवले. त्यांच्या फोनवरून त्यांच्या घरी फोन लावून 5 कोटींच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी लांडेच्या कुटुंबीयांनी बिबवेवाडी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, ज्योतिष काळे, सुमीत ताकपेरे यांच्या पथकाने आरोपींना कर्नाटकातून अटक केली.

तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी कर्नाटकातील रायचूरमधील एका गावात असल्याचे पोलिसांना समजले. त्यासाठी कर्नाटक स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बिबवेवाडी पोलीस व स्थानिक पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर पुजारी लांडेंसह सात शिष्यांची सुटका करून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या