
केंद्रीय नागरी लोकसेवा परीक्षा देऊन पदावर निवड होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि जात प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर, मंगळवारी त्यांच्या नियोजित मुदतीपर्यंत मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये परतल्या नाहीत. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार याकडे आता सर्वांच लक्षं लागलं आहे.
त्यांच्या निवडीबाबत वाद निर्माण झाल्यानंतर खेडकर यांना अकादमीत परत बोलावण्यात आलं होतं आणि त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यांना 23 जुलैपर्यंत परतण्यास सांगण्यात आलं होतं.
मसुरीतील LBSNAA ही नागरी सेवकांसाठीची प्रशिक्षण संस्था आहे.
16 जुलै रोजी महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी पूजा खेडकर यांना पत्र लिहून सांगितलं की, त्यांचा सरकारसोबतचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला आहे. पूजा खेडकर यांनी अकादमीला कळवलं नाही किंवा पत्राला उत्तरही दिलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
‘पुजा खेडकर, IAS 2023 बॅचचे जिल्हा प्रशिक्षण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पुढील आवश्यक कारवाईसाठी त्यांना तात्काळ अकादमीत परत बोलावण्यात येईल. राज्य सरकारला विनंती आहे की परिवीक्षाधीन महिलेला ताबडतोब कार्यमुक्त करावे आणि त्यांना अकादमीमध्ये सहभागी होण्याचा सल्ला द्यावा. अकादमी लवकरात लवकर, कोणत्याही परिस्थितीत 23 जुलैच्या आत परत यावे’, असं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं (DoPT) महाराष्ट्र सरकारला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
खेडकर यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.