‘अक्षरभारती’मधून सुलेखन सौंदर्याचे दर्शन

सुलेखन सौंदर्याचे दर्शन तसेच प्राचीन लिपींविषयी कलात्मक माहिती देणाऱया ‘अक्षरभारती’ प्रदर्शनाचे आणि पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून अनोखे पुस्तक साकारले आहे.

‘अक्षरभारती’मध्ये प्राचीन ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रंथी, शारदा, मोडी, अवेस्तन, सिद्धमपासून देवनागरी, गुजराती, उर्दू, गुरमुखी, कन्नड, तेलुगू, मल्याळम या लिपींचा कलात्मक आढावा घेण्यात आला असून देशातील 36 सुलेखनकारांची 236 अक्षरचित्रे या पुस्तकात आहेत. याशिवाय गणेश देवी, डॉ. संतोष क्षीरसागर, डॉ. बलसेकर, जी. व्ही. श्रीकुमार, नारायण भट्टाथिरी आणि अशोक परब यांचे अभ्यासपर लेख समाविष्ट आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले.

काही निवडक चित्रांचे ‘अक्षरभारती’ प्रदर्शन जहांगीरच्या कला दालनात मांडण्यात येणार असून 3 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. नेहमी लिहिल्या जाणाऱया लिपींचे सौंदर्य वेगळ्या आणि मोठय़ा प्रमाणात कसे दिसते हे पाहण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले.