कर्नाटकमधील बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री एन. मुनिरत्न नायडू यांना बलात्कार प्रकरणात नुकताच जामीन मिळाला. त्यानंतर मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते पोहोचले. परंतु बलात्काराचा आरोप असलेल्या मुनिरत्न यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप असल्याचा प्रत्यय त्यांना त्या वेळी आला. त्यांच्या डोक्यावर काही जणांनी अंडी फेकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.
कार्यक्रम आटोपून आपल्या वाहनाकडे जात असताना मुनिरत्न यांच्यावर अंडी फेकण्यात आली. या वेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मुनिरत्न यांना सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. या हल्ल्यानंतर मुनिरत्न यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझ्यासोबत कुठलीही दुर्घटना घडली तर त्याला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, त्यांचे भाऊ डी.के. सुरेश, काँग्रेस नेत्या कुसुमा आणि त्यांचे वडील हनुमंतरायप्पा हे जबाबदार असतील, असे मुनिरत्न यांनी म्हटले आहे.