दाताचे डॉक्टर करतात हेअर ट्रान्सप्लांट, हायकोर्टात जनहित याचिका; मनाई करण्याची मागणी

दाताचे डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट करत असल्याचा धक्कादायक आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दाताच्या डॉक्टरांना हेअर ट्रान्सप्लांट करण्यास मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

द डायनामिक डरमोटॉलॉजी अ‍ॅण्ड हेअर ट्रान्सप्लांट असोसिएशनने ही याचिका केली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मेडिकल कौन्सिलने जर दाताच्या डॉक्टरांना हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी परवानगी दिली असेल तर त्यात अडचण काय आहे.

कौन्सिलमध्ये तज्ञ आहेत. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यापेक्षा या याचिकेत नेमकी कोणाला नोटीस जारी करावी याचा तपशील असोसिएशनने सादर करावा. जेणेकरून त्यांना नोटीस जारी करता येतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या याचिकेवर पुढील गुरुवारी सुनावणी होणार आहे.

ट्रेनिंग न घेता हेअर ट्रान्सप्लांट केल्यास धोका होऊ शकतो. विशेष ट्रेनिंग न घेता उपचार करणे म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा ठरतो, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

काय आहे याचिका

डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने 6 डिसेंबर 2012 रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार ओरल व मॅक्सीकोफेशल सर्जनला हेअर ट्रान्सप्लांटची परवानगी देण्यात आली आहे. हे सर्जन म्हणजे दाताचे डॉक्टर आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.